Wednesday, June 4, 2008

शाळा.....

शाळा.....

लहान लहान मुलांच्या मोठ्ठया मोठ्ठ्या मनात
आकांक्षांचं पीक ऊरी , वारं भरल्या कानांत !

त्रास देणारा शेजारचा मित्र पण जवळचा वाटतो
आवडणारी मुलगी लांब असून जवळची वाटते !

कडीच्या डब्यातली एकाच साजुक तूप-साखरेची पोळी
"गोल्ड्-स्पॉट्"च्या वॉटर बॅग मधील पाण्याची चव शिळी !

"मस्तीखोर" म्हणून उभी पट्टी तळहातावर मारणार्‍या बाई
मधल्या सुट्टीत भरवायच्या त्यांच्या डब्यातली पोळी !

तूप-साखर गेली आणि आता "ब्रेड्-बटर आलं
पण लहान मुलांच्या मनात मात्र तेच भावविश्व ओलं !

फक्त .....चुकलं की सर्वांसमोर ओरडणार्‍या "बाई"
आणि सुधारावं म्हणून मारणारे "सर" आता दिसत नाहित !

चार भिंतींच्या वर्गांत बसतात हल्ली काही तास "शाळार्थी"
आपुलकी नसलेल्या शाळात हल्ली "विद्यार्थी" दिसत नाहित !

मुलं तशीच आहेत , अभ्यासक्रम तेव्हढा बदललांय
शिक्षकांचा "रोल" मात्र त्यांनी पालकांकडे ढकललाय !

तरी पण मुलांना आवडणारं ते दुसरं एक घर आहे
आपापल्या शाळेनं केलेलं त्यांच्या मनांत घर आहे !

कारण हात उगारणारे सर किंवा बाई आता कदाचित नसतील , पण
वर्गातल्या मुलाला लागलं म्हणून रडणारे एखादे तरी वर्गशिक्षक असतील !

मस्ती केली की ओणवं उभं करणारे सर दिसतीलच कशाला?
"दमलं असेल पोरगं !" म्हणून पाणी देणार्‍या शिपायाची सर कशाला?

एकही विषय न शिकवणारे असतील शाळेचे मुख्याध्यापक
आणि वर्गात फिरून शिकवण्याची दृष्टी नाही आता व्यापक !

नाममात्र अस्तित्व घेऊन गल्ली बोळांत हल्ली उभ्या आहेत इमारती
'कळलें नाही तर "क्लास"मधे विचारा' या शिक्षकांच्या इशारती !

तरी पण आवडते सगळ्याच मुलांना शाळा
सोडा वॉटर सर्-बाई अन् चीर पडलेला फळा !

कारण चुकार फटीतून झिरपत असतं जसं पावसाचं पाणी,
तसा फुलवत असतो एखादा शिक्षक,एखादा शिपाई ....हा मळा !

------------------------------------------------------------------------------------गोखले एजुकेशन सोसायटी - बोरिवली पश्चिम - च्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यानिमित्त २४-जुलै-'०७ रोजी केलेली आणि जाहीर वाचन झालेली एक कविता.....उदय गंगाधर सप्रे-ठाणे

Sunday, May 18, 2008

मनाचिया अंगणात

मनाचिया अंगणात

मनाचिया अंगणात दरवळतो हा वसंत
संगतीस नाहिस तू , ठुसठुसते हीच खंत !

गुरफटलो अवचित मी , मोकळ्यां केसांत तुझ्या
तप भंगले महर्षिंचे , मी कुठला होय संत?

भिजलेल्या रात्रींच्या आठवणी त्या अनंत
जगण्याचे श्वास ज्यांस नसे आदी नसे अंत !

संवेदनांच्या पल्याड , जाऊन मी तिष्ठतोय
होशील ना माझी मग, जन्माची सरताच भिंत ?

-----------------------उदय गंगाधर सप्रे-ठाणे------१८ मे, २००८------------

Sunday, April 20, 2008

.....बळ दे !

.....बळ दे !

दोन हांत जोडून माझं एकंच मागणं देवा ,
दु:ख दूर करु नकोस , पण ते सोसायचं बळ दे !

कोण तसा जीवनांत सुखासीन असतो?
स्वदु:खात आणि परसुखात हसायचं बळ दे !

जीवनाच्या जुगारांत हार्-जीत असणारच ,
एकदा तरी "सुंदर" शी खेळी "फसायचं" बळ दे !

दिवसा ढवळ्या भले कितीही पापं लपू देत ,
अंधारातही स्वतःच्या चुका दिसायचं बळ दे !

कुणीतरी जीव लावेलंच ना या वेड्याला?
थकून कधी ते अश्रू ढाळील , तर ते पुसायचं बळ दे !

स्वप्नं ऊरी कवटाळून रमी खेळत रहाणारा मी ,
सरते "शेवटी" "प्लस्" व्हावं , इतकं पिसायचं बळ दे !

स्वप्नंपूर्तीनंतर फारसं जगावंसं वाटत नाही , पण.....
राहिलोच तसा , तर्.....सर्वांत असूनही नसायचं बळ दे !

Saturday, April 19, 2008

दंव

दंव

ग्रीष्मातली पानगळ बघून
पहाटे पहाटे देव रडला

त्याचा आसवांचा सडा
पाना-फुलांवर अलगद् पडला

माणूस.....इतका भावनाशून्य
कसा कांय देवाकडून घडला?

अश्रू ओळखेनात देवाचे?
म्हणे केव्ह्ढा हा"दंव" पडला !

--------------------------------------------------
उदय गंगाधर सप्रे-ठाणे
कलास्वाद : http://uday-saprem.blogspot.com

आणि

कवितांजली : http://uday-sapre.blogspot.com/

गजरा.....

गजरा.....

लांब केसांची वेणी उदास वाटते
केसांत फुलं माळ ग जरा

"चेहृयामागेही सौंदर्य आहे !"
डोकावून हळूच सांगेल गजरा

उदय गंगाधर सप्रे-ठाणे
कलास्वाद : http://uday-saprem.blogspot.com

आणि

कवितांजली : http://uday-sapre.blogspot.com/

नकलाकार.....

नकलाकार.....

कधी अभिनय कधी नकला
अशा कला करतो साकार आहे

वेड्यावाकड्या आयुष्याला आपल्या
तो नेहेमीच देतो आकार आहे

मेजकं तेव्हढंच सर्वांचं उचलून
ते रंगवणारा कलाकार आहे

सगळ्यांच्या नकला सादर करणारा
मराठीत मात्र "न" कलाकार आहे !

-------------------------------------
उदय गंगाधर सप्रे-ठाणे
कलास्वाद : http://uday-saprem.blogspot.com

आणि

कवितांजली : http://uday-sapre.blogspot.com/

Friday, April 18, 2008

"उरून राहता येतं!"

उरून राहता येतं !

हातात काठी आली म्हणून कुणी वृ ध्द होत नाही
वय लहान असूनही सर्वांना कुठे तरुण राहता येतं?

चांदणं आधी मनांत फुलावं लागतं अलगद्
मगच पौर्णिमेच्या चंद्राचं सौख्य पाहता येतं !

मनाचा गाभारा बुलंद असेल तरच दृष्टीचा फायदा
उगीचच का रवींद्र जैनच्या संगीतात सुरांना नाहता येतं?

कुंचला फिरवता आला नाही तरी बेहत्तर
रसिकता असेल, तर शिंतोड्यातही नहाता येतं !

तुमचं प्रेमंच इतकं उत्तुंग हवं कुणाहीवरचं
मग्.....ते "परकं" झालं तरी तुम्हाला चाहता येतं !

येणार्‍या हर अनुभवांत काव्य दडलेलं असतं
हे समजणार्‍यालाच काव्य सराहता येतं !

कैफ दु:खाचाही असा बेधुंद असावा , की
चुकून आलंच कधी तर्.....सूख पण साहता येतं !

कुणाच्याही दु:खात आपले डोळे भरतातच
किती जणांच्या सुखात पण, अश्रूंना वाहता येतं?

स्वतःला विसरून आपलंसं करावं कुणाला
तेंव्हाच कुठे कुणाच्या स्मृतीत "उरून राहता येतं!"