Wednesday, June 4, 2008

शाळा.....

शाळा.....

लहान लहान मुलांच्या मोठ्ठया मोठ्ठ्या मनात
आकांक्षांचं पीक ऊरी , वारं भरल्या कानांत !

त्रास देणारा शेजारचा मित्र पण जवळचा वाटतो
आवडणारी मुलगी लांब असून जवळची वाटते !

कडीच्या डब्यातली एकाच साजुक तूप-साखरेची पोळी
"गोल्ड्-स्पॉट्"च्या वॉटर बॅग मधील पाण्याची चव शिळी !

"मस्तीखोर" म्हणून उभी पट्टी तळहातावर मारणार्‍या बाई
मधल्या सुट्टीत भरवायच्या त्यांच्या डब्यातली पोळी !

तूप-साखर गेली आणि आता "ब्रेड्-बटर आलं
पण लहान मुलांच्या मनात मात्र तेच भावविश्व ओलं !

फक्त .....चुकलं की सर्वांसमोर ओरडणार्‍या "बाई"
आणि सुधारावं म्हणून मारणारे "सर" आता दिसत नाहित !

चार भिंतींच्या वर्गांत बसतात हल्ली काही तास "शाळार्थी"
आपुलकी नसलेल्या शाळात हल्ली "विद्यार्थी" दिसत नाहित !

मुलं तशीच आहेत , अभ्यासक्रम तेव्हढा बदललांय
शिक्षकांचा "रोल" मात्र त्यांनी पालकांकडे ढकललाय !

तरी पण मुलांना आवडणारं ते दुसरं एक घर आहे
आपापल्या शाळेनं केलेलं त्यांच्या मनांत घर आहे !

कारण हात उगारणारे सर किंवा बाई आता कदाचित नसतील , पण
वर्गातल्या मुलाला लागलं म्हणून रडणारे एखादे तरी वर्गशिक्षक असतील !

मस्ती केली की ओणवं उभं करणारे सर दिसतीलच कशाला?
"दमलं असेल पोरगं !" म्हणून पाणी देणार्‍या शिपायाची सर कशाला?

एकही विषय न शिकवणारे असतील शाळेचे मुख्याध्यापक
आणि वर्गात फिरून शिकवण्याची दृष्टी नाही आता व्यापक !

नाममात्र अस्तित्व घेऊन गल्ली बोळांत हल्ली उभ्या आहेत इमारती
'कळलें नाही तर "क्लास"मधे विचारा' या शिक्षकांच्या इशारती !

तरी पण आवडते सगळ्याच मुलांना शाळा
सोडा वॉटर सर्-बाई अन् चीर पडलेला फळा !

कारण चुकार फटीतून झिरपत असतं जसं पावसाचं पाणी,
तसा फुलवत असतो एखादा शिक्षक,एखादा शिपाई ....हा मळा !

------------------------------------------------------------------------------------गोखले एजुकेशन सोसायटी - बोरिवली पश्चिम - च्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यानिमित्त २४-जुलै-'०७ रोजी केलेली आणि जाहीर वाचन झालेली एक कविता.....उदय गंगाधर सप्रे-ठाणे

1 comment:

Unknown said...

athwani jagya jhalya ......

masttttttttt.